चांदोलीत वाघीणीची यशस्वी जंगलात मुक्तता; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा, STR T–04 जंगलात परतली
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्रसंख्यावाढीत आज एक ऐतिहासिक पाऊल टाकत चांदोली राष्ट्रीय उद्यानात नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या STR T–04 या वाघीणीला नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून तिचे वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, अनुकूलन व प्रशिक्षण करण्यात आले होते. 18 नोव्हेंबरला एनक्लोजरचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला असला तरी वाघीण दोन दिवस आतच फिरत राहिली होती. त्या काळात तिने एनक्लोजरमध्येच शिकार केली आणि नैसर्गिक जीवनशैलीचे सर्व संकेत दर्शवले. अखेर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता ती अतिशय शांत, डौलदारपणे दरवाजातून बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण करत मोकळ्या वनक्षेत्रात प्रवेश केला.
वाघीणीच्या चांदोली आगमनानंतर तिला जंगलातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अनुकूलन प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची शिकार करण्याची प्रवृत्ती, नैसर्गिक परिस्थितींना दिलेली प्रतिक्रिया, क्षेत्रचिन्हीकरणाची पद्धत आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा अभ्यास करण्यात आला. भारतीय वन्यजीव संस्था (WII) येथील वैज्ञानिक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाचे तज्ज्ञ पथक तिला दररोज तपासत होते. अखेर सर्व निरीक्षणानंतर ती संपूर्णपणे तंदुरुस्त असून जंगलातील स्वतंत्र जीवनासाठी पूर्ण योग्य असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला.
वाघीणीच्या मुक्तीनंतर तिला सतत निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी अत्याधुनिक रेडिओ कॉलर प्रणाली बसविण्यात आली आहे. Satellite Telemetry व VHF Tracking च्या माध्यमातून तिच्या हालचाली दिवस-रात्र नोंदवल्या जातील. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि WII या सर्व संस्थांचे प्रशिक्षित पथक तयार ठेवण्यात आले आहे. तिच्या निवासस्थानी बदल, शिकार पद्धती, मानवी वस्त्यांपासून अंतर, नैसर्गिक हालचाली यांची नोंद सातत्याने घेतली जाईल. अचानक परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी Veterinary Rapid Response टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यावर क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी सांगितले की, वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दाखवली आहे आणि तिचे सर्व वर्तन नैसर्गिक जंगलातील वाघांसारखेच दिसून आले आहे. ती आता पूर्णपणे स्वावलंबी जीवनासाठी सक्षम आहे. आम्ही तज्ञांच्या सहकार्याने तिच्या पुढील प्रत्येक हालचालीचे काटेकोर वैज्ञानिक निरीक्षण करणार आहोत. तर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक म्हणाले की, राज्यात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवला जात आहे. या वाघीणीच्या यशस्वी पुनर्वसनामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचे एकत्रित सहकार्य महत्त्वाचे ठरले. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, WII चे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, तसेच अनेक वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने हा टप्पा राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून जंगलातील जैवविविधतेसाठीही तो सकारात्मक ठरणार आहे. चांदोलीच्या जंगलात नव्या उमेदीने दाखल झालेली ही वाघीण सह्याद्रीच्या वन्यजीव संवर्धनासाठी नवी सुरुवात मानली जात आहे.

