पुणे- बेकायदेशीर रित्या भाडेकरूला थेट रस्त्यावर आणणाऱ्या घर मालकाविरोधात आणि त्याला साथ देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास पोलीस आयुक्तांनी चांगलाच धडा शिकविला आहे
पोलीस ठाण्यात येऊन घराला परस्पर कुलूप लावल्याची तक्रार भाडेकरुने केली असता घरमालकाला असे तुम्हाला करता येणार नाही, हे सांगून त्यांना गुन्हा करण्यापासून परावृत्त केले नाही. त्यामुळे घरमालक आणि सामाजिक कार्यकर्त्या यांनी विनापरवाना घरात शिरुन भाडेकरुचे सामान बाहेर काढून ठेवले . या घटनेत गुन्हा करण्यापासून आरोपींना परावृत्त न करता कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा करुन बेजबदारपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य केल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खराडीतील सहायक पोलीस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख यास निलंबित केले आहे.घरमालक राजकुमार बन्सल व प्रभा करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबतची माहिती अशी, गौरव शिवशंकर लखानी (वय ३५, रा. गेरा पार्क व्हिव आय, साऊथ विंग, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. लखानी हे राजकुमार बन्सल (वय ६४, रा. गेरा एमरेल्ड, खराडी) यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये २७ एप्रिल २०२५ पासून भाड्याने रहात होते. १५ सप्टेंबर २०२५ रोजी घरमालक राजकुमार बन्सल यांनी त्यांच्या भावाला एक महिन्याच्या आतमध्ये घरखाली करा, अशी नोटीस दिली होती.त्यावेळी त्यांनी आम्हाला दुसरे घर बघण्याकरीता वेळ द्या, असे सागिंतले होते. तरी सुद्धा त्यांनी ३१ ऑक्टोंबर रोजी फिर्यादी यांना न विचारता व घरात कोणी नसताना त्यांच्या घरास घरमालकाने कुलूप लावल्याचे दिसून आले. घरमालकाविरुद्ध तक्रार देण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी ते खराडी पोलीस ठाण्यात आले. तेव्हा घरमालक राजकुमार बन्सल व सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे हे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी दुसरे घर पाहण्याकरीता ८ दिवसांची मुदत मागितली. त्यावेळी आम्ही तुम्हाला मुदत देणार नाही, तुम्ही आताच्या आता घर खाली करा, नाही तर आम्ही तुमचे घरातील सामान बाहेर काढून ठेवू, असे सांगून ते निघून गेले होते. फिर्यादी लखानी हे कामाला निघून गेले. रात्री ८ वाजता घरी गेले, तेव्हा त्यांच्या घरातील सामान हे सोसायटी लिफ्टचे समोर पार्किंगमध्ये ठेवलेले दिसले. विनापरवाना घरात शिरुन घरातील सामान बाहेर काढुन स्वत:चे लॉक लावले.
त्यावरुन खराडी पोलिसांनी घरमालक राजकुमार बन्सल व प्रभा करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडील पत्रावरुन फिर्यादी हे भाड्याने रहात असताना त्यांच्या घरामध्ये विनापरवाना प्रवेश करुन घरामधील साहित्य बाहेर काढले. त्यासाठी तुम्हास हा गुन्हा करण्यापासून आरोपींना परावृत्त करता आले असते, परंतु तुम्ही तसे न करता कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा करुन बेजबाबदारपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य केले आहे, त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे.

