महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही
मुंबई : महाराष्ट्रात एनडीए आपापसात भांडताना दिसत आहे याची तक्रार करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतली का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता शिंदे म्हणाले, तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे आणि आपण ते पाहिले आहे वेळोवेळी. या छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो आणि खरे म्हणजे बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते त्यामुळे तिथे मोठे यश मिळाले. तसेच बिहारच्या जनतेला पूर्वीचे जंगलराज नको होते, विकास राज पाहिजे होते. महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितले की एकजुटीचे बळ काय असते आणि जनतेने महायुतीला यश मिळाले.
शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर तुम्ही अमित शहा यांना भेटला, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे तुमचे कल्पना विलास आहे, हे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलो आहे आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढे सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्याचे जे काही प्रश्न आहेत हे राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा केली. त्यातून एवढेच ठरले की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हा विषय संपला आहे. हा विषय इथे दिल्लीत नव्हताच मुळात.
रवींद्र चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, यावर काय म्हणाल? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबतीत त्यांचे जे काही पक्ष श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील. आणि हा विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि मी शिवसेनेचा नेता आहे आम्ही आमच्या नेत्यांना सूचना देण्याचे काम केले आहे. महायुती मजबुतीने निवडणुकांना सामोरे जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले यश मिळणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अचानक दिल्लीला भेट देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांविषयीची आपली नाराजी अमित शहांना कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकारांशी संवाद साधला असून भेटी संदर्भात माहिती दिली आहे.….दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे. त्यामुळे मी बिहारच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. चांगली चर्चा त्यांच्यासोबत झाली. बिहारमध्ये दैदीप्यमान यश मिळाले आहे त्यामुळे जाताजाता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

