अजिंक्यपद विजेत्या महावितरण पुणे-बारामती संघाचा श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते गुणगौरव
पुणे, दि. १९ नोव्हेंबर, २०२५- खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते तसेच खिलाडू वृत्ती जोपासली जाते. पुढे त्याचा फायदा वीज कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करताना होत असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाने अजिंक्यपद मिळविले होते. त्यानिमित्त विजेत्या संघाचा संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते रास्तापेठ येथील कार्यालयात बुधवारी (दि. १९) गुणगौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन करताना श्री. राजेंद्र पवार म्हणाले, मागील काही वर्षांपासून महावितरणमधील खेळाचा दर्जा उंचावत चालला आहे. कंपनीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. या खेळाडुंना लागणाऱ्या सुविधा मध्ये देखील दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. नवीन भरतीमध्ये देखील अनेक खेळाडू कंपनीत आले आहेत. त्यामुळे पुढील काळात स्पर्धा अधिक वाढेल. यावर्षी ज्यांना बक्षिसे मिळाली नाहीत. त्यांनी अधिक मेहनत घेऊन पुढच्या स्पर्धेत मुसंडी मारावी. सोबतच अजिंक्यपद कायम पुणे-बारामती संघाकडेच राहील यासाठी प्रयत्न करावेत.
व्यासपीठावर प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, पुणेचे मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे, बारामतीचे मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंते श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. सिंहाजीराव गायकवाड, श्री. अनिल घोगरे व श्री. संजीव नेहते यांची उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले, खेळामुळे आयुष्याला एक शिस्त येते. हारणे, जिंकणे हा खेळाचा विषय आहे. पण प्रत्येकाने स्वत:च्या ‘फिटनेस’साठी खेळलेच पाहिजे. महावितरणमध्ये येत्या काळात खेळासाठी स्वतंत्र धोरण आणावे अशी आग्रही मागणीही श्री. खंदारे यांनी केली. तर खेळाडुंनी फक्त तयारी करावी, त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे व श्री. धर्मराज पेठकर यांनी दिली.
भारताच्या खो-खो संघाचा कर्णधार तथा महावितणचा खेळाडू प्रतिक वायकर, अजय चव्हाण व अनिता कुलकर्णी या खेळाडुंनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. पुणे-बारामती संघाच्या विजयासाठी प्रयत्न करणारे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे व श्री. श्रीकृष्ण वायदंडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

