श्रीरामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन ; सोमवारी (दि. २२) सलग १२ तास विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यातील पेशवेकालीन श्रीराम मंदिरात रामराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सलग १२ तास विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले यांनी दिली.
सोमवारी रामरक्षा स्तोत्र पठणापासून कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून सायंकाळी श्रीरामाची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. अयोध्येतील सोहळा लाईव्ह स्वरूपात पाहण्यासाठी स्क्रीनची सोय देखील मंदिर परिसरात करण्यात आली आहे.
सकाळी १० वाजता रामपंचायतन अभिषेक महाभिषेक व पवमान अभिषेक होणार आहे. सकाळी १०.३० ते १२ यावेळेत श्रीराम राज्याभिषेक सोहळा पायघड्या कार्यक्रम तुळशीबाग कुटुंबियांच्या वतीने होणार आहे. यावेळी कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी यांचे लळीताचे कीर्तन होईल. तसेच सुधारामायणाची गाणी, स्वरतरंग श्रीराम भक्तीगीते, बालप्रतीभा रामचरणी, कथक नृत्य सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामाची पालखी प्रदक्षिणा होईल. तरी रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.