पुणे – मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन जमीन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. “या प्रकरणात पार्थ पवार यांचा नेमका सहभाग काय हे तपासण्यासाठी, घटनेच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ४:३० या वेळेत त्यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासण्यात यावेत,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तसेच, या गंभीर प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर त्या ठाम आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी आरोपी सूर्यकांत येवले याला मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जर येवलेला कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता, तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव उघड झाले असते. हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झाला आहे.” पोलिसांनी आता तातडीने न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्याला अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव वदवून घ्यावे, असे थेट आव्हानच दमानिया यांनी पोलिसांना दिले.

पोलिस डायरीचा दाखला आणि दादागिरीचा आरोप
यावेळी दमानिया यांनी पोलिस डायरीतील नोंदींचे वाचन करून गंभीर बाबी समोर आणल्या. त्या म्हणाल्या, आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण पोलिस स्टेशन डायरीतले उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. १६ जून २०२५ दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलिस ठाण्यात हे कळवण्यात आलं की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करुन आमच्या सिक्युरीटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो. त्यावेळी बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-५७), महेश पुजारी आणि फिल्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे चार गार्ड हजर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेश मोरे यांनी नियुक्ती केली आहे. पण ती जागा बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्यांनी पोलिसांना फोन केला. जागा रिकामी करुन घ्या अशी मागणी करतात.
बॉटनिकल गार्डनच्या जागेवर ‘अमेडिया’ कंपनीने हक्क सांगत जागा रिकामी करण्यासाठी दबाव टाकला होता. या कंपनीच्या वकिलाने फोन करून पोलिसांची फौज बोलावून घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, कंपनीच्या माणसांकडे जागेची कोणतीही कागदपत्रे नव्हती. तरीही कंपनीचे वकील आणि बाऊन्सर्स यांनी तिथे जाऊन दादागिरी केली, असा आरोप दमानिया यांनी केला.
पार्थ पवार यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना त्या म्हणाल्या, “पार्थ पवार यांचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तत्काळ मागवावा. त्यातील ‘कोड’वरून आणि टॉवर लोकेशनवरून घटनेच्या वेळी ते अडीच किलोमीटरच्या परिघात कुठे होते, याचा उलगडा होईल. तसेच पोलिस ठाण्यात आणि गार्डनमध्ये घुसणारी माणसे कोण होती, हे देखील तपासात निष्पन्न होईल.”
आतापर्यंत पार्थ पवार यांचे नाव एफआयरमध्ये घातले नाही, तर ते होईल. पोलिसांनी मोठा वकील ठेवून सूर्यकांत येवले यांचा अंतरीम जामीन रद्द करावा, त्यांना अटक करावी आणि हा सर्व प्रकार करण्यास कोणी भाग पाडले, याबाबत त्यांचा जबाब नोंदवावा. या सगळ्याचा उलगडा झाल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर येतील. पार्थ पवारला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाहीये. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी मी लढत राहणार आहे, असा निर्धार अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

