पुणे-येरवडा येथे लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा किरकोळ वादातून मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी रवी साबळे (वय- 35) आणि त्याचे वडील रमेश साबळे (65) या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केले आहे. आराेपींनी सदर महिलेचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच दाेन ते तीन दिवस ठेवला. त्यानंतर त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेह एका स्मशानभूमीजवळील उकीरड्यावर फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार निष्पन्न झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयता महिला आणि आरोपी रवी साबळे हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 14 नोव्हेंबर रोजी किरकोळ घरगुती वादातून त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले. या वादादरम्यान लाकडी दांडके, विटेने मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. मृतदेह मिळून आल्यानंतर ताे ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृत्यूचे कारण ब्लंट फोर्स ट्रॉमा असे नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने 14 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी रिक्षा मध्ये मृतदेह टाकून तो लाेहगाव वाघाेली रस्त्यावर स्मशान-भूमीचा जवळील कचराकुंडी जवळ फेकून दिला. डंपिंग स्पॉटवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी मृत महिला आणि दोन्ही आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर पुढील तपास करत आहे.

