पुणे- महापालिकेने शहरात शेकोटी पेटवण्यावर बंदी घातली आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे आणि श्वसनाचे आजार वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले आणि निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर लाकूड, कचरा, चिंध्या किंवा कोळसा जाळतात. यातून निघणाऱ्या धुरामुळे शहरातील हवा प्रदूषणात वाढ होत आहे, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड, पीएम १०, पीएम २.५ आणि इतर हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते. यामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन दमा, अस्थमा आणि इतर श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण होतो.शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध कायदे व नियम बनवले आहेत. यामध्ये ‘हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१’, ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६’ आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाची मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश आहे. या नियमांनुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ (बायोमास), प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई आहे.
या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सोसायटीचे वॉचमन, सफाई कामगार, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यामुळे आता नागरिकांना थंडीमध्ये शेकोटी पेटवता येऊ शकणार नाही त्यामुळे अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

