पुणे-
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीनंतर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली प्रथम कार्यकारिणी बैठक आमदार मा. प्रवीण दरेकरजी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत शिस्तबद्ध व सुव्यवस्थित पद्धतीने संपन्न झाली.
या बैठकीत विविध समित्यांची प्रभावी पुनर्रचना व महत्त्वपूर्ण पदनियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र बॉक्सिंग कोचिंग कमिशनच्या अध्यक्षपदी पुणे शहरातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विजय गुजर यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री. गुजर गेल्या २२ वर्षांपासून सातत्यपूर्णपणे बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू घडले आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली दोन छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू तयार झाले असून, अनेक खेळाडू विविध शासकीय सेवांमध्ये यशस्वीरीत्या रुजू झाले आहेत.
सध्या श्री. विजय गुजर पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव म्हणूनही अत्यंत निष्ठेने व कार्यतत्परतेने जबाबदारी पार पाडत आहेत.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष मा. अविनाशजी बागवे यांनी त्यांच्या या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

