डेक्कन विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.प्रसाद जोशी ; शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे विविध वेद पुरस्कार वितरण तसेच पाच वैदिक पाठशाळांना मदतीचा हात
पुणे : ज्ञानपरंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. ही भूमी भोगभूमी नाही, तर ज्ञानभूमी, तपोभूमी आहे. ज्ञानाचा मूलस्रोत वेद हा आहे. मानवजातीचा सर्वात प्रथम वाङ्मय अविष्कार हे आपले वेद आहे. असे वाङ्मय कोणत्याही देशाला लाभले नाही. समाज धारणेची पायाभूत गोष्ट ही वेद आहेत. वेदांचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत सुरु आहे. आजच्या पिढीपर्यंत सुरु असलेली मौखिक परंपरा आहे. गुरुकुल चालविणाऱ्या वेदमूर्ती यांच्याकडे याचे श्रेय जाते, असे मत डेक्कन विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन समिती तर्फे आयोजित वेदविद्या पुरस्कार वितरण सोहळा सणस मैदानासमोर, वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पार पडला. यावेळी यावेळी सिंघल फाउंडेशन चे मुख्य न्यासी संजय सिंघल, वेदविद्या समिती अध्यक्ष प्रा.रवींद्र मुळे, कार्यवाह श्रीकांत जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात वेदमूर्ती विजय भालेराव यांना वैदिक घनपाठी पुरस्कार, वेदमूर्ती राहुल बेळे यांना वैदिक अध्यापक पुरस्कार तसेच अथर्व हरिदास, हर्षद कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, सोमनाथ जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे होते.
याशिवाय श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा, संत नामदेव महाराज वेद विद्यालय, औंढा नागनाथ, ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा, अध्यात्मिक प्रतिष्ठान, आळंदी, जीवन ज्योती प्रतिष्ठान पिरंगुट या पाच वैदिक पाठशाळांना प्रत्येकी ११ हजार रुपये छात्र भोजनासाठी प्रदान करण्यात आले. तसेच माणिक शेठ दुधाने यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात आला. त्याच वेळी कै. रत्नमाला व कै गजानन जोशी स्मरणार्थ दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार विवेक गोपाळ कुलकर्णी यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोख रक्कम रू ११,०००/- असे होते.
संजय सिंघल म्हणाले, वेदांच्या संरक्षणासाठी अशोकजी सिंघल यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांना सर्वजण राम मंदिराच्या विषयाकरिता अधिक ओळखतात. मात्र, त्यांच्या जीवनातील मुख्य कार्य वेदांचे संरक्षण हे होते. वेदांकडून त्यांनी प्रेरणा घेऊन कार्य केले. वेदांमध्ये जी ताकद आहे, त्यांचे उदाहरण म्हणजे माझे काका अशोक सिंघल हे आहेत. त्यामुळे आम्ही अखिल भारतीय स्तरावर पुरस्कार सुरु केले. भारताच्या ज्ञान परंपरा जगाचा उद्धार करेल. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी वेदांशी जोडले जाणे आवश्यक आहे. निसर्गासोबत जगण्याचे ज्ञान भारतीयांकडे आहे. भारतीय ज्ञान परंपरेला पुढे नेण्यातच जगाचे कल्याण आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. रवींद्र मुळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत जोशी यांनी संस्थेची माहिती दिली. वेदमूर्ती कुणाल शिंगणे यांनी सूत्रसंचालन केले.

