भाजप, संघ आदिवासींचा सर्वात मोठा शत्रू
मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राजकीय पक्ष संपवणे हाच भाजप व संघाचा अजेंडा आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीद्वारे ते स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप व संघाचा राजकीय पक्ष संपवणे हा अजेंडा आहे. त्यांचा हा अजेंडा बिहारच्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याविषयी शंका आहे. राजदवर त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारला आहे. त्याच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. त्यामुळे मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी मतदारांनी सातत्याने भाजप व संघाविरोधात लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.
उमेदवार जिंकतो की हारतो याची पर्वा न करता वंचित बहुजन आघाडीला ताकद द्यावी. त्यातून पक्ष जिवंत आहे, आम्ही तो टिकवायला बसलो आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी नुकताच मोदींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण वरून गोड व आतून खोटे होते. वास्तव हे आहे की, नरेंद्र मोदी, भाजप व संघ आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू आहेत. भाजप व संघ आदिवासींना आदिवासी म्हणण्याऐवजी वनवासी म्हणतो. त्यातून त्यांची ऐतिहासिक ओळख कमकूवत करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी धोरणे व शब्दावली आदिवासी समाजाची ऐतिहासिक स्थिती, सांस्कृतिक ओळख व त्यांच्यावरील राजकीय दावे व घटनात्मक अधिकारांना कमकूवत करण्याचा भाजप व संघाच्या रणनीतीचा भाग आहे.
औद्योगिकीकरण, उत्खनन व विकासाच्या नावाने भाजप व संघाने अगोदरच आदिवासींचे जल, जंगल व जमीन हिरावून घेतली आहे. आता ते आदिवासींना ब्राह्मणवाद, वैदिक हिंदुत्व सनातन धर्माच्या संरचनेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे त्यांची अद्वितीय संस्कृती व ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप व संघ सातत्याने आदिवासींना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांपासून वंचित करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः सहाव्या अनुसूची अंतर्गत त्यांचे अधिकार नाकारले जात आहेत. नरेंद्र मोदी, भाजप व संघ आदिवासींच्या जल, जंगल व जमिनीच्या अधिकाराचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे आंबेडकर म्हणाले होते.

