फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापले
मुंबई-आजच्या प्री-कॅबिनेटला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. पण त्यानंतर झालेल्या कॅबिनेटला एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री पोहोचला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्यात येत असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शिंदे गटाचे मंत्री भेटीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी उभय नेत्यांत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना मित्रपक्षांचे पदाधिकारी पळवण्याच्या मुद्यावरून चांगलेच झापल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आजच्या बैठकीत आयकॉनिक शहर विकासासाठी धोरणही जाहीर केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे या बैठकीत जनमतावर प्रभाव टाकणारे कोणतेही मोठे निर्णय घेण्यात आले नाही. केवळ निवडक विभागांचे 6 निवडक विषय या बैठकीद्वारे हातावेगळे करण्यात आले. यात सरकारने बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
राज्यात सध्या नगरपरिषद व नगरपंचायत निडवणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळे राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यातच भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी पळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे. या नाराजीतूनच शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर कथितपणे बहिष्कार टाकला.
तुम्ही उल्हासनगरमध्ये या प्रकाराची सुरुवात केली. तुम्ही जे केले ते आम्ही चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर ते चालणार नाही असे अजिबात चालणार नाही, असे ते म्हणाल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे एकमेकांचे नेते, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नका. दोन्ही पक्षांनी या प्रकरणी पथ्य पाळावीत. तुम्ही पथ्य पाळणार असाल तर भाजपही पथ्य पाळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना सुनावले. या प्रकाराची आज दिवसभर मंत्रालय परिसरात चर्चा सुरू होती.


