पुणे -सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनाची लाज असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केली. दमानिया यांच्या या मागणीमुळे पुण्यातील मुंढवा भूखंड प्रकरणात अडकलेल्या पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत.
अंजली दमानिया आज मुंढवा येथील जमीन पाहण्यासाठी गेल्या होत्या. पण प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, मुंढवा येथील जमिनीची माहिती घेण्यासाठी मी आले होते. पण आत गेटमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी मला तिथे जाण्याची परवानगी नाकारली. मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषेत परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कुणाच्यातरी दबावाखाली ही परवानगी नाकारल्याचा संशय आहे. पण मी या सर्व गोष्टींचा किस पाडणार आहे. मी आज या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्या पत्रकारांना देईन.
अजित पवार यांनी यापूर्वीच मुंढवा भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण आहेत? मुळात उपमुख्यमंत्री हे पदच घटनाबाह्य आहे. हे पदच अस्तित्वात आहेत. ते अर्थमंत्री आहेत. अर्थ मंत्रालयाच्या नियम पु्स्तिकेनुसार त्यांना आपल्या खात्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत पडू शकत नाहीत. कोणताही व्यवहार हा त्याच्या कायद्याने रद्द होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात त्याच्या सेक्शन प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलिफ अॅक्टनुसार जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्या म्हणाल्या, आत्ताच्या घडीला सुरुवातीला सांगितले गेले गेले की, 21 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हा आम्हाला पैसे नकोत. आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्यापुढे ते म्हणतात, 21 कोटी नव्हे 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करू शकतात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कुणाकडेही ते अधिकार नाहीत.
कारण, यात फ्रॉड झाला आहे. त्यामुळे यात सिव्हिल कोर्ट यातील गैरव्यवहार तपासत नाही तोपर्यंत हा व्यवहार कुणीही रद्दबातल करू शकत नाही. सरकारने यासंबंधी एखादी कारवाई केली तर मी त्याला हायकोर्टात आव्हान देईन, असे दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मला आत्ता बऱ्याच ठिकाणावरून बरीच माहिती गोळा करायची आहे. त्यामुळे मी आता कुठे जात आहे व कुणाला भेटणार आहे हे मी काही सांगू शकत नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टी सांगेन. कोणत्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तत्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात मी आरोप केले होते तेव्हा त्यांनी सायंकाळी 5 वा. अचानक राजीनामा दिला होता.
पण आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्री आहेत. असे असताना सरकारने पुण्याच्या अधिकाऱ्यांचा भरणा असलेली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून निष्पक्ष चौकशीची कशी अपेक्षा ठेवावी हा प्रश्न आहे. त्यामुळे अजित पवारांनी मनाची लाज असेल तर तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.

