मुंबई, १७ नोव्हेंबर २०२५ : “शब्दांनी मनाला भिडणारा संवाद, विचारांनी हक्क आणि स्वाभिमान जागवणारा नेता, धैर्य आणि परखड भूमिकेचे प्रतीक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या दिली – ‘जो स्वतःला भारतीय म्हणतो तो हिंदू’ – ती आजही सर्वसमावेशक राष्ट्रवादी विचारधारेची दिशा दाखवणारी ठरते,” असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना केले.
हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषद उपसभापती कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याचा तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली.
“माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. १९९८ पासून त्यांच्या वाढदिवसाला, विजयादशमीला, संक्रांतीला आम्ही भेटायला जात असे. माझी काही पुस्तक प्रकाशने देखील त्यांनी स्वतः केलेली आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची भूमिका ते दक्षिणेकडचे राजकीय प्रश्न असोत किंवा राष्ट्रीय मुद्दे – बाळासाहेबांचे नेतृत्व सदैव प्रभावी आणि तेजस्वी राहिले,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
“राजकारणात मला संजीवनी देणारे, योग्य संधी आणि दिशा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची कायम ऋणी आहे. आजही प्रत्येक स्मृतिदिन, जयंती किंवा महत्त्वाच्या प्रसंगी मी त्यांना अभिवादन करून प्रार्थना करते. त्यांना माझे हजार प्रणाम”, अशी कृतज्ञतापूर्वक आदरांजली डॉ. गोऱ्हे यांनी वाहिली.

