‘याद-ए-बेगम अख्तर’ : सूर, नाद आणि शब्दांचे गुंजन
पुणे : मल्लिका ए गझल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेगम अख्तर यांनी गाऊन अजरामर केलेल्या अनेक गझला, दादरा व ठुमरी ऐकण्याची संधी रसिकांना लाभली. निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आयएमए आर्ट्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘याद-ए-बेगम अख्तर’ या अनोख्या सांगीतिक मैफलीचे!
आपल्या दिलखेचक आणि जादूई आवाजाने बेगम अख्तर यांनी गझल, ठुमरी आणि दादराच्या माध्यमातून रसिकांना मोहित केले होते. त्यांनी आपल्या गायनातून भारतीय शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात ठसा उमटविला होता. या मैफलीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे-ढवळे यांनी सादरीकरण केले. कलाकारांना अरुण गवई (तबला), कुमार करंदीकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. आयएमए आर्ट्स सर्कल यांच्या सहकार्याने डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे’, ‘दूर है मंझिल राहे मुश्किल’, ‘इश्क मे गैरते’, ‘कुछ तो दुनिया की इनायत ने’, ‘करेजवा मे लागे कटार’, ‘बलमवा तुम क्या जानो’, ‘मेरे हमनफस मेरे हमनवा’, ‘हमरी अटरिया पे आवो सावरिया’ अशा सुप्रसिद्ध रचना ऐकविल्या.
गझल हे आंतरिक संगीत असून त्यात शब्दांची लयात्मकता, सौंदर्य महत्वाचे असते. गीतकार, गझलकार शकील बदायुनी, सुदर्शन फाकिर, अली अहमद जलिली अशा गझलकारांनी रचलेल्या रचना त्यातील वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्यातून निर्माण झालेले भाव आणि ते गाताना योग्य उच्चारांचे महत्त्व असे विश्लेषण करत डॉ. सुनील देवधर यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून मैफलीत रंग भरले.
कलाकारांनी प्रभावीपणे सादर केलेल्या रचनांमधून शब्द, सूर आणि भावना यांचा अनोखा मेळ साधला गेला.
प्रेम, विरह, नैराश्य, दु:ख आदी भाव प्रकट करणाऱ्या रचनांमधील सूर, नाद आणि शब्द रसिकांच्या मनात गुंजत राहिले.
कलाकरांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, डॉ. मोहन जोशी, डॉ. भुतकर यांनी केला तर डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

