पुणे: गुन्हेगारीच्या घटनांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. सिंहगड कॉलेजजवळ एका 20 ते 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून, रात्री उशिरा किंवा पहाटे हा खून झाला असावा असा अंदाज आहे. हत्येचा पॅटर्न पाहता हा पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह पाहिल्यानंतर तातडीने सिंहगड रोड पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, प्राथमिक पाहणीत तरुणाच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या खुणा आणि शरीरावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, “एका 20 ते 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करत तरुणाला मारलं असल्याचा संशय आहे.”
दरम्यान, सध्या, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरून खुनी कोण आहे याचा छडा लावता येईल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

