प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज : पवित्रम् फाऊंडेशनकडून ‘पवित्रम्’ मोबाईल ॲप पुणे चॅप्टर चे लोकार्पण
पुणे: सर्व प्रकारची व्यवसाय क्षेत्र अन्य धर्मीय लोकांनी शांतपणे काबीज केले आणि आपल्यावर आक्रमण केले. ३५ पेक्षा अधिक प्रकारचे जिहादी युद्ध आपल्यावर लादले जाते. हे युद्ध परतवून लावण्यासाठी आपण समर्थ आहोत का यापेक्षा जागृत आहोत का हे महत्वाचे आहे. बॉम्ब, पिस्तूल उचलण्याची आवश्यकता नाही. फक्त पवित्रम् ॲप वापरण्याची गरज आहे. हे अत्यंत प्रेमाने आपल्याला करता आले पाहिजे. मी वस्तू खरेदी करून खर्च केलेला पैसे कुठे जाणार याचा विचार करायला हवा. समाज व्यवस्थित संघटित झाला तर बाकीचे निष्क्रिय होतील हिंदू समाजातील पैसा हिंदू समाजातच टिकला पाहिजे, असे मत श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या चे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास, मथुराचे उपाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम् फाऊंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी साकारलेल्या ‘पवित्रम्’ या मोबाईल ॲपच्या पुणे चॅप्टरचे लोकार्पण एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरीयम, कर्नाटक हायस्कूल येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, पवित्रम फाउंडेशनचे अध्यक्ष सुबोध शहा, तुषार कुलकर्णी, शशांक मेंगडे, सारंग देव, राजेश तोळबंदे, आशिष कांटे, किशोर सरपोतदार उपस्थित होते.
ॲप लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बेकरी, चावीमेकिंग, फळ, फुले, गॅरेज, खाटिक या क्षेत्रात सातत्याने व्यवसाय करणा-या हिंदुंचा प्रातिनिधिक सत्कार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचे हस्ते करण्यात आला. मिठाई, फरसाण व डेअरी असोसिएशनने सोहळ्यामध्ये पवित्रम च्या कार्यासाठी रुपये ५१,०००/- ची देणगी दिली. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या स्व. संतोष जगदाळे आणि स्व. कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी व परिवार या प्रसंगी उपस्थित होता. सर्व हिंदूंनी ‘पवित्रम् ॲप’ चा वापर केला तर ती स्व. संतोष जगदाळे आणि स्व. कौस्तुभ गनबोटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, धर्म कार्य नीटपणे आजीवन करायचे असेल तर आर्थिक सुबत्ता गरजेची आहे. अर्थ याला पुरुषार्थ देखील म्हटले आहे. मनुष्याच्या जीवनात अर्थ महत्वाचे आहे. प्रत्येकाचे जीवन अर्थ संपन्न असल्याशिवाय त्याला विकास करता येत नाही. प्रत्येकामध्ये हिंदुत्वाची आस्था निर्माण होण्याची आणि सक्रिय होण्याची गरज आहे. समाजाला सावरण्यासाठी १० ते २० वर्षे आहेत जर आत्ता सावरला नाही तर काय होईल सांगता येत नाही.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व हिंदूंनी पवित्रम् सारख्या उपक्रमात ताकदीने उतरले पाहिजे. आपण दिलेला व्यवसायातील पैसा कुठे जातो, याचा विचार करायला पाहिजे.
तुषार कुलकर्णी म्हणाले,हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपल्याला एकत्र येणे आवश्यक आहे. ‘पवित्रम्’ ॲप हे केवळ तांत्रिक साधन नसून, हिंदू व्यापारी आणि ग्राहकांना जोडणारे एक सशक्त व्यासपीठ आहे. या उपक्रमाद्वारे ‘हिंदू खरेदी हिंदूंकडून’ ही संकल्पना वास्तवात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये नोंदणी विनामूल्य असून समाजातील विविध व्यावसायिक, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

