नवी दिल्ली–
लोकशाही देशातील नागरिकांसाठी प्रसारमाध्यमे ही डोळे आणि कान असतात. राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करत असताना, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या( एआय) युगातील वाढत्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता जपणे हे नागरिकांना सशक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आज आयोजित कार्यक्रमात सहभागी प्रतिनिधींनी ही भावना व्यक्त केली. वाढत्या चुकीच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता सुरक्षित ठेवणे या यंदाच्या विषयाची भूमिका मांडताना पीसीआयच्या अध्यक्षा न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई म्हणाल्या, “एआय कधीही मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही.” निर्णयक्षमता, सद्सद्विवेकबुद्धी आणि जबाबदारीची भावना, जी प्रत्येक पत्रकाराला मार्गदर्शित करते, तिनेच चुकीची माहिती पसरण्यापासून रोखले पाहिजे.

आपल्या मुख्य भाषणात पीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जोशी यांनी आज समाजाला भेडसावत असलेल्या माहितीच्या महामारीला तोंड देण्यासाठी उपाय सुचवला. ते म्हणाले, “पारंपरिक माध्यमांमध्ये वेगापेक्षा अचूकतेला प्राधान्य द्या आणि डिजिटल माध्यमांतील एआय आधारित गणितीय पद्धतीपेक्षा विश्वसनीयतेला स्थान द्या.” कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. तसेच माहिती व प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि पत्रकार परिषद सचिव शुभा गुप्ता यांचीही उपस्थिती होती.
पीसीआयकडून जबाबदार पत्रकारितेचे आवाहन
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि उच्च दर्जाच्या पत्रकारितेचे पालन ही पीसीआयची दुहेरी जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, विशेषतः आजच्या काळात, जेव्हा चुकीची माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढत आहे, तेव्हा पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, अचूकता आणि योग्य माहिती देण्याची बांधिलकी अत्यावश्यक आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआयने) समित्या आणि तथ्य शोध पथके तयार केली असल्याचं त्यांनी नमूद केले तसेच पत्रकारांना जबाबदार वर्तणुकीची आणि आणि प्रत्येक वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे स्मरण करून दिले. त्यांनी, कल्याणकारी योजना आणि विमा यांद्वारे पत्रकारांच्या आर्थिक सुरक्षेचे महत्त्वही अधोरेखित केले आणि पीसीआयच्या अंतर्वासिता कार्यक्रमामुळे तरुण पत्रकारांना नैतिक कार्यपद्धती शिकण्यास मदत होईल असेही सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरू शकते मात्र पीसीआय, त्याचा दुरूपयोग रोखण्यासाठी सतर्क असते. साधने कितीही प्रगत झाली तरीही, मानवी मन- निर्णयक्षमता आणि विवेक यांची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत, यावर त्यांनी भर दिला.
एआयच्या जगात विश्वासार्हता टिकवून ठेवणे
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जोशी म्हणाले की, माध्यमांनी, लोकशाहीचे नैतिक रक्षक म्हणून भक्कम नैतिकता बाळगली पाहिजे. पैसे देऊन बातम्या छापणे, जाहिरात आणि पीत पत्रकारिता यांमुळे सार्वजनिक विश्वासार्हतेला धक्का पोहोचल्याचा इशारा त्यांनी दिला.
पत्रकारांनी देखील सत्यता पडताळून पाहण्याची सामाईक जबाबदारी पेलली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. पीटीआयच्या स्थापनेपासून जपलेली सत्य, अचूकता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य यांची परंपरा, 99 वर्तमानपत्रांनी अधोरेखित केली असल्याचे ते म्हणाले. गतीपेक्षा अचूकता नेहमीच आघाडीवर असली पाहिजे आणि कोणत्याही विशिष्ट हेतूंपासून बातम्या मुक्त असल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
तथ्य पडताळणी -फॅक्ट चेक सारख्या पुढाकारांमुळे, बहुस्तरीय पडताळणीमुळे चुकीच्या माहितीच्या पुराचा सामना करण्यास मदत होते. विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी भविष्यातील पत्रकारांना नैतिकता आणि चिकित्सक विचारसरणीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. माध्यम स्वातंत्र म्हणजे माहितीची परिसंस्था प्रदुषित करण्याचा परवाना नाही आणि पत्रकारिता ही विश्वासावर आधारित सार्वजनिक सेवा असल्याची आठवण जोशी यांनी करून दिली.

