कनेक्टिंग ट्रस्टतर्फे नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन’ या विषयावर सलग तीन दिवस विचारमंथन होणार आहे. ही परिषद पुण्यातील हॉटेल तरवडे क्लार्क्स इन, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या सँडी अर्नाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ट्रस्टचे सल्लागार मंडळ सदस्य वीरेन राजपूत व अमीना अजाने, प्रशिक्षक डॉ. आदिती आर., स्वयंसेवक दीपाली वीरमालवार व लॉरेन डेव्हिड आदी उपस्थित होते.
सँडी अर्नाडे म्हणाल्या, “आत्महत्या प्रतिबंधासाठी खुला संवाद, सामायिक अंतर्दृष्टी आणि सामूहिक कृती यांवर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाईल. आत्महत्यांचे प्रमाण का वाढत आहे आणि कोणते उपाय प्रभावी ठरत आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. ही परिषद मानसिक आरोग्य व्यावसायिक, स्वयंसेवक, समाजसेवक, विद्यार्थी आणि संबंधित क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी उपयुक्त आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात मानसिक आरोग्य व्यावसायिक परिषदेतील मुख्य भाषणे, चर्चासत्र आणि कौशल्य-आधारित सत्रांमध्ये सहभागी होतील. हे तज्ज्ञ मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधापासून ते स्वानुभव, युवा, शिक्षण आणि समुदाय कार्यापर्यंत विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सध्याच्या कामातील सकारात्मक बाबी अधोरेखित होऊन सामूहिक कृतीसाठी नवीन शक्यतांचा शोध घेतला जाईल.”
“२८ नोव्हेंबर रोजी पूर्व-परिषद कार्यशाळा आयोजिली आहे. पहिला दिवस (२९ नोव्हेंबर) मुख्यत्वे आत्महत्या प्रतिबंधातील प्रमुख विषयांवर आधारित असेल. यामध्ये स्वानुभव आणि सामाजिक संदर्भांवर भर दिला जाईल. मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्हचे संचालक राज मारीवाला यांचे बीजभाषण होईल. त्यानंतर चर्चासत्रे, कौशल्य-निर्माण सत्रे आणि चिंतनात्मक बैठक याद्वारे विविध दृष्टिकोन आणि संवादांना चालना दिली जाईल. दुसरा दिवस (३० नोव्हेंबर) आत्महत्या प्रतिबंधातील कृती-आधारित मार्गांवर असेल. आत्महत्या प्रतिबंधाच्या कार्यात सक्रिय असलेल्या विस्कॉन्सिन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. अरुणा झा यांचे बीजभाषण होईल. भविष्य-केंद्रित भाषणे, पुरावा-आधारित सादरीकरणे आणि कौशल्य-विकास सत्रे होतील,” असे दीपाली वीरमालवार यांनी नमूद केले.
कनेक्टिंग ट्रस्ट ही स्वयंसेवक-आधारित संस्था असून ती आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी काम करते. आत्महत्यांच्या वाढत्या दरावर प्रतिबंध आणण्यासाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण समुदाय निर्माण करण्याच्या उद्देशाने ही संस्था विविध कार्यक्रम आणि सेवा चालवते. कनेक्टिंग ट्रस्टचे डिस्ट्रेस हेल्पलाईन क्रमांक ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ असे आहेत. ही सेवा रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य सुरू असते. distressmailsconnecting@gmail.com ईमेलद्वारेही संवाद साधता येतो. परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी https://www.suicidepreventionconference.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन वीरेन राजपूत यांनी केले.

