पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असताना या अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार एका व्हिडीओने समोर आणला आहे . एका बाजूला कुटुंब होरपळून मृत्युमुखी पडले असताना दुसरीकडे काही नागरिकांनी अपघातस्थळी लुटालूट करण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेने काही लोकांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवलं आहे.
अपघातानंतर एका बाजूला लोक मदतीची अपेक्षा करत होते, तर दुसरीकडे काही जणांनी लुटालूट सुरू केली. दोन ट्रकच्या भीषण अपघातानंतर पैसे आणि सोन्याचे दागिने लुटण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पुण्यातील अपघातानंतर वाहनाला आग लागल्याने एका लहान चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला होता, तर कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला होता. समाजात हळहळ व्यक्त केली जात असताना काही असंवेदनशील व्यक्तींनी मात्र सोने आणि पैसे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

