राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मंगळवारी समारोप
पुणे: निसर्गोपचाराच्या तत्त्वज्ञानाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी – एनआयएन) आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त तीन दिवसीय नैसर्गिक आहार महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवार (ता. १६) ते मंगळवार (ता. १८) या कालावधीत येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये हा महोत्सव विविध वैज्ञानिक, शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे, अशी माहिती प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी डॉ. सत्यनाथ, ओमप्रकाश शुक्ला, मंदार देशपांडे, सौरभ साकल्ये आदी उपस्थित होते.
अमरेंद्र सिंह म्हणाले, “निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित हा आहार महोत्सव रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुला असेल. ‘निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे’ अशी यावर्षीची संकल्पना आहे. या महोत्सवात तेलमुक्त, वनस्पती-आधारित आहारावर भर देण्यात येणार असून, प्रात्यक्षिके, शैक्षणिक प्रदर्शने आणि आरोग्यदायी पदार्थांचे स्टॉल्स आहेत. याप्रसंगी निसर्गोपचार व योग शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन मीट आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये वैद्यकीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व-निबंध, संशोधन पेपर सादरीकरण, फिजकल्टोपॅथी, रील्स स्पर्धा, फायर शिवाय कुकिंग, फळ-भाजी कोरीवकाम व आयडिया हॅकाथॉन यांचा समावेश आहे. तर शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, तसेच ऑस्टिओपॅथी व चिरोप्रॅक्टिक कार्यशाळा होणार आहेत.”
“या नैसर्गिक आहार महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि. १६) दुपारी ४ वाजता होणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन, विविध प्रकाशनांचे लोकार्पण व स्पर्धांच्या विजेत्यांची घोषणा होईल. कार्यक्रमात डॉ. दिनशाह के. मेहता (उत्कृष्ट तज्ज्ञ) व डॉ. एस. एन. मूर्ती (उत्कृष्ट पी.जी. विद्यार्थी) यांना पुरस्कार प्रदान केले जातील,” असेही त्यांनी नमूद केले.

