पुणे- महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आणि समाविष्ट गावातील सर्व मिळकतधारकांसाठी महत्वाची योजना आणण्यात आली आहे. करदात्यांना थकीत दंडावर -विशेष सूट देण्यासाठी अभय योजना २०२५ – २६ ही १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. अभय योजनेत थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५% सूट मिळणार आहे. अशी माहिती मिळकत कर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.यापूर्वी (वर्ष २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२) या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका मिळकत कर विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व थकीत करदात्यांना असे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी “अभय योजना २०२५-२६ चा लाभ घ्यावा.संपूर्ण कर ( थकबाकीसह) एकरकमी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, जनता सहकारी बँक व कॉसमॉस बँक तसेच ऑनलाईनद्वारे भरणेकरिता propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर भरता येईल. पुणे महानगरपालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहतील. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच धनादेश– कर आकारणी व कर संकलन प्रमुख पुणे मनपा – THE ACCESSOR And COLLECTOR OF TAX PMC PUNE. या नावाने काढता येईल.
उपायुक्त रवी पवार यांनी घेतला आढावा आणि केल्या सूचना
दरम्यान अभय योजना लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर कर संकलन आणि कर आकारणी विभाग प्रमुख तथा उपायुक्त रवी पवार यांनी योजना राबवण्यात बाबत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आढावा घेऊन सूचना केल्या. पवार यांनी सांगितले कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचवण्यासाठी प्रयत्न करा. कर भरण्यासाठी लोकांना मदत करा. तसेच नागरी सुविधा केंद्रामध्ये नागरिकांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.पुणे शहरातील सर्व थकीत मिळकतदार यांना आवाहन आहे कि त्यांनी महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घेऊन मिळकत कराची थकीत रक्कम त्वरित भरावी.असे आवाहनही त्यांनी केले आहे.

