नवीन भरती प्रक्रियेत १४१५३ अर्ज- मागील भरतीचे २७८७९ अर्ज
पुणे -महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. यासाठी आता १ डिसेंबर पर्यंत परीक्षा होऊ शकते, असा अंदाज महापालिका प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत.
पुणे महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी ९ जानेवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या प्रक्रिये मराठा आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरकारकडे मार्गदर्शन मागवले होते. याबाबत सरकार कडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सरकारने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला होता. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले गेले आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली होती. याचा देखील ४ हजार हून अधिक उमेदवारांनी फायदा घेतला आहे. त्यानुसार महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. दरम्यान आता अर्ज आल्यानंतर या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून हे काम IBPS या संस्थेला दिले आहे. त्यानुसार संस्थेकडून तयारी पूर्ण होत आली आहे. पुणे शहर शिवाय मुंबई आणि इतर शहरात या परीक्षेचे केंद्र असणार आहेत. या बाबत संस्था आणि महापलिका यांच्यात चर्चा सुरु आहे. त्यानुसार १ डिसेंबर पर्यंत ही परीक्षा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय ५ डिसेंबर नंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू शकते, त्यामुळे परीक्षा १ डिसेंबर घेतली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.दरम्यान भरती प्रक्रियेत अर्ज करण्याचा कालावधी हा ३१ ऑक्टोबर पर्यंत होता. मात्र या कालावधीत किती उमेदवारांनी अर्ज केले, याची तत्काळ माहिती महापालिका प्रशासनाला IBPS कडून मिळाली नाही. याची माहिती प्रशासनाला १२ नोव्हेंबर ला मिळाली. संस्थेकडून सांगण्यात येत होते कि, अर्जातील डुप्लिकेशन आम्ही शोधत आहोत. त्यामुळे माहिती देण्यास उशीर होत आहे.

