मुंबई-बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने विरोधी बाकावरील महाआघाडीचा पुरती दाणादाण उडवली आहे. बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता वेगवेगळ्या पक्षांनी केलेली सुमार कामगिरीही समोर येत आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल 14 जागा लढवल्या होत्या. पण या सर्वच जागांवर राष्ट्रवादीला पराभवाचे तोंड पहावे लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यापैकी एकाही उमेदवाराला 500 मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्याहून अधिक मते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पडली आहेत. सध्या या ठिकाणी एनडीए किंवा महाआघाडीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या बिहारमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नारकटियागंज येथे मोहम्मद राशिद अझीम यांना उमेदवारी दिली होती. त्यांना आतापर्यंत केवळ 104 मते मिळाली. नौटन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जय प्रकाश यांना केवळ 43 मते मिळाली. तर पिंप्रा येथील अमित कुमार कुशवाहा यांना 370, मनिहारी येथील सैफ अली खान यांना 196, पारसा येथील बिपीन सिंह यांना 144, सोनेपूर येथील धर्मवीर कुमार यांना अवघी 25 मते मिळाली आहे.
याशिवाय महुआ विधानसभा मतदारसंघात अखिलेश कुमार ठाकूर यांना 149 मते, राघोपूर येथे अनिल सिंह यांना 147 मते, बाखरी येथील विकास कुमार यांना 127 मते, अमरपूर येथील अनिल कुमार सिंह यांना 52 मते, पाटना साहिबचे राष्ट्रवादीचे उमेदवार आदिल आफताब खान यांना 192 मते, मोहानिया मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना कुमार यांना 80 मते, सासाराचे उमेदवार आशुतोष सिंह यांना 21 मते व दिनारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोज कुमार सिंह यांना अवघ्या 53 मते मिळाली आहे. सध्याचा ट्रेंड पाहता 14 पैकी कोणताही उमेदवार 500 मतांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सर्वांवर डिपॉझिट जप्त होण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे.

