कामगारांची फसवणूक केल्याचा ठाकरे गटाचा आरोप
मुंबई-शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबई येथील हॉटेल ताज लँडच्या बाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार व नेते अनिल परब देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करत भाजप प्रणीत संघटनांमध्ये घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर जमले असता गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणीत संघटना आहे, तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हॉटेल ताज येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित होते. ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी अनिल परब त्या ठिकाणी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर परब यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.
कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पोलिसांनाच जाब विचारला. यामुळे येथे काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच जावे असे पोलिसांनी सांगितले. त्याला अनिल परब यांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यात शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या सह्या फसवून घेतल्याचा दावा परब यांनी केला.

