पुणे: “पश्चिम बंगालसारख्या दुसऱ्या राज्यातून येऊन अमितकुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या माध्यमातून बालग्रामसारखा उपक्रम राबविला. महाराष्ट्रात वंचित घटकांसाठी, अनाथ मुलांसाठी संस्थेच्या माध्यमातून इतके मोठे काम उभे केले, ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. देश, समाजसेवेसाठी जाती-धर्म, प्रांत, भाषा यापलीकडे जाऊन कार्य करायला हवे,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी केले.
अमितकुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी देवधर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, सुधीर राशिनकर, अण्णा कातळे आदी उपस्थित होते.
सुनील देवधर म्हणाले, “संपर्क संस्थेच्या बालग्राम या उपक्रमाचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. बॅनर्जी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे. निराधार मुलांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत. प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून खूप गोष्टी आयुष्यभर मिळत असतात, सेवाभावातून आपण प्रत्येकाने त्याची परतफेड करायला हवी. मात्र जे लोक समाजासाठी काही करत नाहीत, ते कृतघ्न असतात. तसेच आपण करत असलेले सेवाकार्य हे निरपेक्ष, पवित्र असायला हवे, त्यामध्ये भ्रष्टाचार नको आणि त्याचा व्यवसाय होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.”
अमितकुमार बॅनर्जी म्हणाले, “जवळपास ३५ वर्षापूर्वी ७ अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती. आज देशभरात संस्थेची ११ केंद्रे आहेत. केवळ भावनिक होऊन सामाजिक काम केले नाही, तर सगळी गणिते योग्य पद्धतीने सांभाळत हे काम उभे केले. माझ्यासोबत असलेल्या असंख्य जणांनी प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली त्यामुळे मी हे काम करु शकलो. पुस्तक म्हणजे माझे आंदोलन नाही, तर माझ्या कामाचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न आहे.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “अमितकुमार बॅनर्जी यांच्यासारख्या व्यक्तीचे काम हे राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या राज्यात येऊन संघर्ष करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल आणि या आत्मकथनाने अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल.”
यावेळी डॉ. अनिल गुंजाळ, प्रसाद मिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर चेतन देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या कार्यात विविध टप्प्यांवर मदतीचा हात देणाऱ्या अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सीईओ अनुज सिंग, परेश खाडिलकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

