पुणे, दि. 14: जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली यांच्या वतीने अग्निवीर जनरल ड्यूटी , अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर लिपिक (ऑफिस असिस्टंट) पदांसाठी भरती मेळावा ८ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.
हा भरती मेळावा सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी असणार असून, युद्ध विधवांचे पुत्र, सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे पुत्र, युद्धातील जखमी जवानांचे पुत्र, जाट रेजिमेंटच्या कर्मचाऱ्यांचे कायदेशीर दत्तक पुत्र, जाट रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे सख्खे भाऊ, इतर रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे कायदेशीर दत्तक पुत्र, उत्कृष्ट (मेधावी) खेळाडू यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखांना जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

