पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होत असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला आहे. सरकारचे बुजगावणे झालेली यंत्रणा व निवडणूक आयोग यामुळे लोकशाही व पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आले आहे, असे ते म्हणालेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तिथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला.
आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकीचे निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की!
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो,
हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे. तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणालेत.
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही भाजपवर बिहार निवडणूक महिला मतदारांना तब्बल 10 हजारांची उघड लाच देऊन जिंकल्याचा आरोप केला आहे. महिला मतदारांना अधिकृत उघडपणे दहा हजार प्रत्येकी लाच, पाहिजे ते करून देणारा गुलाम निवडणूक आयोग, वाट्टेल त्यात मदत करणारी लाचार सरकारी यंत्रणा, विरोधकांना ब्लॅकमेल करणारी ईडी, सीबीआय, सर्वबाजूंनी कमावलेला निवडणूकीत बेशरमपणे वापरलेला अफाट काळा पैसा, गुंडगिरी, चोरटेपणा सर्वकाही, असे अनेक मुद्दे बिहार निवडणुकीवर बोलण्यासारखे आहेत. भारतात मतपेटीतून राजकीय परिवर्तन होते वगैरे हा इतिहास झाला, ते वर्तमान नाही, असे ते म्हणालते.

