मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज लागलेल्या बिहार निवडणूक निकालावर त्यांनी भाष्य केले आहे. बिहारमध्ये जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या ठिकाणी एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसत असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!
बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीएला 65 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ नितीशकुमार सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, 90 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, राजद 29 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जनसुराज, आपले खाते उघडू शकलेला दिसत नाही.

