बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा
पुणे: “राज्याच्या कामगार विभागाअंतर्गत कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचे लाभार्थी होण्यासाठी बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळात नोंदणी करावी आणि योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी केले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी जिद्द, परिश्रम, सातत्य, संगत आणि शिस्त पाळण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शनिवार पेठेतील विष्णुकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटू केदार जाधव, सहायक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार, प्रेरक वक्ते समृद्धी जाधव, बीएआयचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, ‘बीएआय’चे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, कोषाध्यक्ष महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रेय पवार म्हणाले, “कामगारांच्या पुढच्या पिढ्यानी उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा कौतुक सोहळा स्तुत्य आहे. कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कामगार विभागाच्या कल्याणकारी मंडळात केल्यास, अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. विशेषतः कामगारांच्या पाल्यांसाठी, शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, कामगार नोंदणी करत नसल्याने त्याचा निधी शिल्लक राहतो. हे चित्र बदलले पाहिजे. कामगारांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून स्मार्ट कार्ड घ्यावे आणि योजनांचा लाभ मिळवावा. पाल्यांनी आपल्या पालकांनी केलेल्या आणि करत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी.”
केदार जाधव यांनी आपल्या जडणघडणीत कुटुंबीय, आसपासचे लोक, शाळा, शिक्षक या सर्वांचा परिणाम होत असल्याने संगत उत्तम ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ज्यांचे सुरवातीचे संघर्ष तीव्र असतात, ते अधिक सक्षमपणे पुढे जातात. मोठी आव्हाने पेलू शकतात. मात्र, यशस्वी होण्यासाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी, संयम, सातत्य आणि सराव, हे जपले पाहिजे. यशस्वी, मोठी माणसे कशी वागतात, बोलतात, त्यांची देहबोली कशी असते, ते कशी भाषा वापरतात, याचे निरीक्षणही विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवा. जे कराल त्याची जबाबदारी स्वीकारा, असा सल्लाही केदार जाधव यांनी दिला.
प्रेरक वक्ते समृद्धी जाधव यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणांतून, ध्येय, संयम, विवेक यांचे महत्त्व उलगडून सांगितले. आपल्या वर्तनाने आपल्या पालकांची मान खाली जाणार नाही, याची काळजी घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत माय आणि मातीला विसरू नका, असा सल्ला दिला.
जगन्नाथ जाधव यांनी आत्मविश्वास, शब्द आणि वेळ पाळण्याचे महत्त्व आणि सातत्य जपण्याचे आवाहन केले. अजय गुजर यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना, कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. राजाराम हजारे यांनी असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. महेश राठी यांनी आभार मानले.

