श्री शिवाजी कुल, पुणे तर्फे बालदिनाच्या निमित्ताने आयोजन
पुणे : हत्तीला शेपूट लावणे…विटांवरून चालणे… डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे… दोरीच्या उड्या… यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांचा आनंद बालवीरांनी गंमत जत्रेत घेतला. लिटिल सिंघमच्या वेशातील कलाकाराने केलेले स्वागत आणि तितक्याच जोशात मुला-मुलींनी केलेला स्काऊट सॅल्यूट असे बालमय झालेले वातावरण सदाशिव पेठेतील स्काऊट क्रीडांगणावर पाहायला मिळाले.
भारत स्काऊट गाईड स्थापना दिन आणि बालदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या वतीने सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर बालवीर गंमत जत्रा २०२५ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्यू.केजी ते ९ वी तील मुले-मुली, त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गंमत जत्रेमध्ये १५ ते १८ विविध प्रकारचे बेस ठेवण्यात आले होते. त्या प्रत्येक ठिकाणी गमतीचे खेळ आयोजित करण्यात आले. यामध्ये एकाग्रता, शारीरिक क्षमता, संयम, अंदाज अशा गुणांची कसोटी लावणाऱ्या खेळांचा समावेश होता. श्री शिवाजी कुल संस्थेचे १०८ वे वर्ष असून यावेळी संस्थेतील आजी व माजी कुलवीर देखील मोठया संख्येने उपस्थित होते.

