पुणे-बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी व्यावसायिकाला गोळी घालून ठार केले, त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला आणि कार घेऊन पसार झाले. सम्पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेजमधील थरार पाहून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी कोणत्या दिशेने पळाले, ते कोठे लपले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (वय 38, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन-खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बसून बोलत होते. त्याच वेळी वैयक्तिक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्या धक्क्याने निपचित पडलेले नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाच आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते.ही घटना समजताच दिघी पोलिस आणि क्राइम ब्रँचची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक तपासात आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांची नावे समोर आली आहेत. नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली असून महत्त्वाच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांना आरोपी लवकर सापडतील याबाबत खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.
नितीन गिलबिले हे चारोळी-चहोली परिसरातील ओळखले जाणारे व्यावसायिक होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांत अलंकारपुरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते तसेच व्यावसायिक गाळे बांधून भाड्याने देण्याचाही व्यवसाय सुरू केला होता. बुधवारी ते खडी मशीन रस्त्यावर काही लोकांशी बोलत थांबले असताना आरोपी कार घेऊन तिथे आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि त्यांच्या हॉटेलच्या दिशेने निघाले. काही मिनिटांतच कारमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती थेट खूनापर्यंत पोहोचली. आरोपींनी गोळीबार करून नितीन यांचा खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत टाकला आणि कार वेगाने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने घेऊन पळ काढला.

