वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून खाक, आत 4-5 जण, पुण्यात भीषण अपघात
प्रत्य्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी एका कंटेनरनं अचानक ब्रेक लावला. त्यावेळी कंटेनरच्या मागे एक कार होती. कंटेनरनं अचानक ब्रेक मारताच मागे असलेली कार कंटेनरला जाऊन धडकली. त्यानंतर कारच्या मागे असलेल्या कंटेनरनं कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली.अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही अपघातस्थळी धावलो. आम्ही पोहोचलो तेव्हा कारला आग लागलेली होती. ट्रकमध्ये अडकलेला एक जण मदतीसाठी आरडाओरडा करत होता. बहुधा तो क्लिनर होता. बाहेर काढा, बाहेर काढा असं तो मोठमोठ्यानं ओरडत होता. पण आगीची तीव्रता पाहता स्फोट होण्याची भीती होती. कधीही स्फोट होईल असं वाटत होतं. त्यामुळे मदतीसाठी कोणीच पुढे गेलं नाही.दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा ब्रेक फेल झाला होता. त्यानं पुढील कंटेनरला धडक दिली. दोन कंटेनरच्या मध्ये एक फॅमिली कार होती. त्यात चार ते पाच जण होते. ती कार पूर्णपणे जळून खाक झाली. ट्रकला आग लागली. कंटेनरचा चालक आणि बाकीचे आतच राहिले. त्यांना बाहेर पडता आलं नाही. ते सगळे आतच जळून खाक झाले.
पुणे: पुण्यातील नवले पूल परिसरात मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं २० ते २५ वाहनांना धडक दिली. हा कंटेनर धडका देत भरधाव वेगात निघाला होता. त्याच्यापुढे एक कंटेनर होता. त्या कंटेनरला धडक देण्याआधी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं एका कारला धडक दिली. लहान कार दोन कंटेनरच्या मधोमध अडकली. या कारचा चक्काचूर झाला. सीएनजीवर चालत असलेल्या कारनं पेट घेतला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांनी प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. हा कंटेनर मंद उतारावरुन खाली येत होता. जवळपास २० ते २५ वाहनांना धडक देत तो पुढे गेला. त्यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली. कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता. दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली. कारमध्ये सीएनजीचा सिलिंडर होता. दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेंदामेंदा झाला. सिलिंडरचा स्फोट होताच आग लागली. त्यामुळे मागील कंटेनरदेखील पेटलाकंटेनरमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.डीसीपी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. कारण उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान लहान आकारचे गतीरोधक आहेत. त्यामुळे कंटेनरचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली असावी.डीसीपी संभाजी कदम यांनी सध्या तरी घातापाताची शक्यता फेटाळली आहे. ‘वाहनांमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याला सध्या प्राधान्य आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. दोन मोठ्या वाहनांना हटवण्यासाठी क्रेन आणल्या गेल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. या अपघातामागील कारणांचा तपास नंतर केला जाईल,’ अशी माहिती डीसीपी कदम यांनी दिली.
प्राथमिक माहिती…
सायंकाळी ०५•४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे अशी वर्दि आली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच पाहिले की, दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतू, दुर्देवाने या घटनेत कंटेनर मधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष दोन महिला व एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.उपस्थित नागरिकांकडून समजले की, एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत.याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

