मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित १९ व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत विविध वर्गवारीमध्ये उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत बुधवारी (दि. १२) महावितरणला पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये हरित ऊर्जा आणि कार्यक्षमता व ग्राहक सेवेची परिणामकता यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान मिळाले आहे.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय ऊर्जा परिषद उत्साहात झाली. महावितरणने हरित ऊर्जा, तंत्रज्ञान स्वीकार आणि ग्राहक सेवेसह वीज क्षेत्रातील विविध उद्दिष्टांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. त्याची दखल घेत या परिषदेत महावितरणला हरित ऊर्जेतील प्रगती (Green Energy) तसेच नाविन्यासह परिणामकता (Innovation with Impact – Large DISCOM) वर्गवारीत देशात प्रथम स्थान मिळवले आहे. तर सेवांची गुणवत्ता आणि ग्राहक सक्षमीकरण (Quality of Services and Customer Empowerment), तंत्रज्ञानाचा स्वीकार (Technology Adoption), नावीन्यासह परिणामकता – सामान्य (Innovation with Impact – General) या वर्गवारीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिसरे स्थान मिळाले आहे. महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता सौ. किरण नागावकर व सौ. सलोनी वाकोडे, कार्यकारी अभियंता श्री. नीलम गांगुर्डे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
अपर मुख्य सचिव (ऊर्जा) सौ. आभा शुक्ला यांनी राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. या नियोजनाद्वारे अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात प्राधान्य दरांवर दीर्घकालिन वीज खरेदी करार (पीपीए) केले आहेत. यात प्रामुख्याने हरित ऊर्जेचे करार आहेत. येत्या २०३० मध्ये राज्याचा हरित ऊर्जा वापर सध्याच्या १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच वीजखरेदी खर्चात देखील ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
सद्यस्थितीत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीमध्ये ३२०४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २७७३ मेगावॅट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून ६ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. यासह देशात सर्वाधिक ६ लाख ४७ हजारांवर सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले असून २१ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.
राज्यातील ३ कोटी १६ लाखांवर वीजग्राहकांना सेवा देताना सर्वच बाबतीत महावितरणने नाविन्यासह परिणामतेत वाढ केली आहे. वसूली व बिलिंग कार्यक्षमतेत वाढ तसेच पायाभूत यंत्रणेचे सक्षमीकरण आदींची दखल घेण्यात आली आहे. विजेच्या मागणीचा अचूक अंदाज घेण्यासाठी एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे. यासह इतर विविध कामगिरीची दखल घेत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणला पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

