५ जणांचा मृत्यू
पुणे-येथील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकला आग लागली असून या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकले होते आणि त्यात एक कार अडकली होती, अशी माहिती समोर आली आहे.
साताराच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आग विझवण्याचे प्रयत्न करत असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावर अनेक अपघात होत असतात, परंतु हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकचा अपघात झाला असून यात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, या कारमधील प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकली असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

