पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अलीकडेच रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठण्यात आली होती. या नोटीसला रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी आता रितसर पद्धतीने पत्र पाठवून उत्तर दिले आहे. त्यांनी पक्षाकडे आपला खुलासा पाठवताना म्हटले की, मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते. मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं होते. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे. मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे. फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेले नाही. मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली, मला याची कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या स्पष्टीकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समाधान होणार का, हे आता बघावे लागणार आहे.
नेमके रुपाली पाटील यांनी पत्रात काय उत्तर दिले आहे ते वाचा जसेच्या तसे ….
प्रति,
श्री. संजय खोडके
संघटन सरचिटणीस
यास
आपण दिनांक ०७/११/२०२५ रोजी जावक क्रमांक १३१३ द्वारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे.
त्याबाबत आपणास खुलासा येणेप्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.
त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षालासुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते त्यावेळी देखील मा.दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते.
मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्त भंग झालेला नाही.
तसेच याबाबत हा माझा खुलासा समजावा.
अॅड. रुपाली पाटील ठोंबरे
दि. १२/११/२०२५,
प्रत रवाना :-
मा.ना.श्री.अजित दादा पवार
(राष्ट्रीय अध्यक्ष)
मा.खा.श्री. प्रफुल्लभाई पटेल
(राष्ट्रीय अध्यक्ष)
मा.ना.श्री. सुनील तटकरे
( प्रदेशाध्यक्ष)


