आत्मकथनाचे शुक्रवारी प्रकाशन
पुणे: संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांच्या ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ आत्मकथनाचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (ता. १४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता कमिन्स सभागृह, पत्रकार भवन, नवीपेठ पुणे येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव, माय होम इंडिया फाउंडेशनचे संस्थापक सुनील देवधर यांच्या शुभहस्ते या आत्मकथनाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस, माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, प्रकाशक सु. वा. जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अनाथ, गरजू मुलांच्या संगोपनासाठी अमितकुमार बॅनर्जी यांनी संपर्क बालग्राम संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या कार्याचा हा खडतर प्रवास या आत्मकथनातून मांडला आहे. वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या मुलांना संस्कार, नैतिकता आणि सामाजिक भान देऊन जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बॅनर्जी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. प्रेम, सुरक्षितता, काळजी आणि त्यांचे जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण देऊन त्यांचा भूतकाळ विसरत चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांनी निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचा आढावा, या आत्मकथनातून घेतला गेला आहे.

