नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य प्रकारात दरवर्षी दिले जाणारे बाल साहित्य पुरस्कार 2025 येत्या शुक्रवारी 14 नोव्हेंबर 2025 नवी दिल्ली तानसेन मार्ग येथील त्रिवेणी सभागृहात होणार आहे. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध गुजराती लेखिका वर्षा दास उपस्थित राहतील आणि अकादमीचे उपाध्यक्ष कुमुद शर्मा आभार प्रदर्शन करतील. साहित्य अकादमीच्या सचिव पल्लवी प्रशांत होळकर स्वागतपर भाषण करतील.
पुरस्कारप्राप्त पुस्तके आणि पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत: मैनाहंतर पद्य (कविता), सुरेंद्र मोहन दास; बंगाली – ऐखोनो गाये कांटा देय (कथा), त्रिदिब कुमार चट्टोपाध्याय; बोडो – खान्थी ब्वस्वन आणि आखु दानाई (कथा), बिनय कुमार ब्रह्म; डोगरी -नन्ही तोर (कविता), पी.एल. परिहार ‘शौक’; इंग्रजी – दक्षिण : साउथ इंडियन मिथ्स अँड फेबल्स रिटोल्ड (कथा), नितीन कुशलप्पा एम.पी.; गुजराती – तिनचाक (कविता), कीर्तिदा ब्रह्मभट्ट; हिंदी – एक बाते बारह (आत्मचरित्र/ललित लेखन), सुशील शुक्ला; कन्नड – नोटबुक (लघुकथा), के. शिवलिंगप्पा हंडीहल; काश्मिरी – शुरे ते तचुरे ग्युष (लघुकथा), इझार मुबशीर; कोकणी – बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो (कथा), नयना अडारकर; मैथिली – चुक्का (लघुकथा), मुन्नी कामत; मल्याळम – पेंग्विनुकलुडे वंकरविल (कादंबरी), श्रीजीथ मूथेदाथ; मणिपुरी – अंगांगशिंग-गी शान्नाबुंगशिदा (नाटक), शांतो एम.; मराठी – आभाळमाया (कविता), सुरेश गोविंदराव सावंत; नेपाळी – शांती वन (कादंबरी), संगमु लेप्चा; ओडिया – केते फुला फुतिची (कविता), राजकिशोर पारही; पंजाबी – जादू पट्टा (कादंबरी), पाली खादिम (अमृत पाल सिंग); राजस्थानी – पंपंखेरुव नी पीडा (नाटक), भोगीलाल पाटीदार; संस्कृत – बालविश्वम् (कविता), प्रीती आर. पुजारा; संताली – सोना मिरू-अग संदेश (कविता), हरलाल मुर्मू, सिंधी – आसमानी परी (कविता), हीना अग्नानी ‘हीर’; तमिळ – ओत्रै सिरगु ओविया (कादंबरी), विष्णुपुरम सर्वानन; तेलुगु – कबुर्ला देवता (कथा), गंगीसेट्टी शिवकुमार; उर्दू – कौमी सितारे (लेख), गझनफर इक्बाल.
सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य अकादमीकडून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येकी ₹50,000/- चा धनादेश आणि एक ताम्रपट देऊन गौरवण्यात येईल.
या पुरस्कार वितरणानंतरच्या दिवशी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2025, रोजी साहित्य अकादमीच्या रवींद्र भवन, फिरोजशहा रोड, नवी दिल्ली येथील प्रेक्षागृहात पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व पुरस्कार विजेते त्यांच्या सर्जनशील अनुभवांविषयी माहिती देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष कुमुद शर्मा भूषवणार आहेत.

