“ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने केली कारवाई
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर “ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत कारवाई केली आहे. परदेशातून भारतात सोने तस्करी करून, गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून स्थानिक बाजारपेठेत त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीच्या कारवाया या मोहिमेमुळे उघड झाल्या.

विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, 10.11.2025 रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चार गुप्त ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले, ज्यामध्ये दोन अवैध वितळवण्याचे युनिट आणि दोन अनधिकृत दुकाने होती.
दोन्ही भट्ट्या पूर्णपणे कार्यरत आढळल्या, ज्यामध्ये मेण आणि इतर स्वरूपात तस्करी केलेले सोने बारमध्ये रूपांतरित करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था होती. अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत ऑपरेटरना ताब्यात घेतले आणि घटनास्थळी 6.35 किलो सोने जप्त केले. तस्करी केलेले सोने घेणे आणि वितळवलेले सोन्याचे बार स्थानिक खरेदीदारांना विकणे या कामांसाठी मुख्य सूत्रधाराने वापरलेल्या दोन दुकानांवर छापे टाकण्यात आले , त्यापैकी एका दुकानातून अतिरिक्त 5.53 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण 11.88 किलो (24 कॅरेट) सोने ज्याची किंमत अंदाजे 15.05 कोटी रुपये आहे आणि 8.72 किलो चांदी ज्याची किंमत 13.17 लाख रुपये आहे, ती जप्त करण्यात आली. सीमाशुल्क कायदा 1962 च्या तरतुदीअंतर्गत हा ऐवज जप्त करण्यात आला.
सोन्याची तस्करी, ते वितळवणे आणि बेकायदेशीर विक्री करण्यात सहभागी असलेल्या एकूण 11 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये यापूर्वीही सोन्याची तस्करी केल्याची नोंद असलेल्या मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे. हा सूत्रधार त्याचे वडील, व्यवस्थापक, चार भाड्याने घेतलेले वितळवणी कामगार, तस्करीच्या सोन्याचे लेखाजोखा ठेवणारा अकाउंटंट आणि त्याचे वितरण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे रॅकेट चालवत होता. सर्व आरोपींना मुंबईतील न्यायिक प्रथम श्रेणी दंडाधिकारी (जेएमएफसी) समोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


