पुणे: “ज्ञानेश्वर माऊलींचा सहिष्णुतेचा संदेश जगाला सुख, समाधान आणि शांती मार्ग दाखवित आहे. या भूमीमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सहिष्णुतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे कार्य केले आहे. ” असे विचार साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधन पर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंतीताई उमरगेकर, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक विक्रांत लांडे, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर, हभप आदिनाथ महाराज फपाळ, हभप बुट्टे पाटील महाराज, नंदकुमार वडगावकर, विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे, रमेश काळोखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड चाटे आणि सौ. उषा विश्वनाथ कराड उपस्थित होत्या.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,”प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची विश्वशांती केंद्र स्थापनेमागची दृष्टी वारकरी संप्रदाय, महाराष्ट्र किंवा देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणे ही आहे. या उद्देशाने ते अविरत कार्य करीत आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने संस्थांची निर्मिती केली आहे त्या संस्थांमध्ये जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याचे सामर्थ्य आहे.”
प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या,”जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या माध्यमातून समाज निमिर्तीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम सर्वच समाजासाठी राबविला जात आहे. समाजाने संतांच्या विचारांवर चालावे आणि विद्यार्थ्यांनीही यातून शिकावे हा यापाठीमागचा उद्देश आहे.”
यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनीही आपले विचार मांडले.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

