पुणे: धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेचे आणि पुण्याचे देशभर उज्ज्वल केले आहे. रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कोमल मानकर हिने सुवर्णपदक पटकविले, तर गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत स्वामिनी सोनवणे हिने सांघिक कामगिरीत सुवर्णपदक मिळवले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोमल मानकर आता गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कोमल मानकर व स्वामिनी सोनावणे या दोन्ही सुवर्णकन्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण व संचालक अनिकेत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होता. कोमलने अतिशय दमदार आणि कौशल्यपूर्ण खेळ करत हे यश मिळवले आहे, तर राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे व महाराष्ट्राचे नाव उंचावणारी कामगिरी स्वामिनीने केली आहे.
काकासाहेब चव्हाण म्हणाले, “संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या विद्यार्थिनींनी केलेली सुवर्ण कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यशामागे खेळाडू, त्यांच्या कुटुंबियांचा आणि क्रीडा शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या या दोन्ही सुवर्णकन्यांनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि यश हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”
अनिकेत चव्हाण यांनी सांगितले की, “लवकरच आपल्या परिसरात आधुनिक ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्यात येणार असून, यामुळे धायरी व सिंहगड रोड परिसरातील अनेक नवोदित खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.”

