मुंबई– पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना अटक झालीच पाहिजे आणि तात्काळ अजित पवार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार अमेडिया कंपनीने केला, त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसांत करणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या व्यवहाराची चौकशी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. चौकशी समितीतील पाच सदस्य पुण्यातील असताना आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, ही समिती निःपक्ष चौकशी करू शकेल का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. या व्यवहारातील चौकशी निःपक्ष होण्यासाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, या व्यवहारात १८०४ कोटींची जमीन ३०० कोटींना घेतली. त्यावर स्पॅम्प ड्युटी भरली नसल्याचे म्हटले जात आहे. माझा पहिला प्रश्न, तिथे असणाऱ्या गायकवाड कुटुंबाला महार वतनाची जमीन मिळाली, ती नंतर खालसा झाली. जमीन खालसा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबीयांना परत कधीही दिली गेली नसताना, त्यांनी पॉवर ऑफ अटोर्नी देऊन व्यवहार कसा करू शकतात? असा सवाल दमानिया यांनी केली.ती जमीन गायकवाड कुटुंबीयांच्या नावावर होणे अपेक्षित होते. त्यानंतरच त्यांना हा व्यवहार करता आला असता. पण शीतल तेजवानीने ११ हजार रुपये ३० डिसेंबर २०२३ रोजी भरते. त्याचे पत्र ३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि तेव्हा जिल्हाधिकारी त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली.या जमिनीची पॉवर ऑफ अटोर्नी सुद्धा नोंदणीकृत नसल्याचा दावा दमानिया यांनी केला. त्यामुळे विक्रीचा व्यवहारात पॉवर ऑफ अटोर्नी नोंदणीकृत असावी लागते, असा कायदा सांगतो, असे दमानिया म्हणाल्या.
पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. अजित पवारांनी सांगितले त्याप्रमाणेच झाल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांचाच राजीनामा मागितला आहे. अमेडिया कंपनीबद्दल आपण अजून काही मोठे खुलासे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कुठलाही व्यवहार रद्द करताना, जागेचा मालक आणि खरेदी करणारा तो रद्द करू शकतात. पण या प्रकरणात शीतल तेजवानी जागेची मालक नाही. तिला गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदीखतावर सही करण्याचे अधिकार नाहीत. तसेच हा व्यवहार पार्थ पवार, अमेडिया कंपनी, शीतल तेजवानी यापैकी कुणीही रद्द करू शकत नाही. कारण हा व्यवहार रद्द करण्याचे अधिकार दोन्ही मंडळींना नाही. कारण त्यांच्याकडे मुळात जमिनीचेच अधिकार नाहीत. हा व्यवहार रद्द करण्याची एक प्रक्रिया आहे. सरकारने कोर्टात दावा करून हा व्यवहार रद्द करू शकतात. ४२ कोटी रुपये भरूनही शीतल तेजवानी, अमेडिया कंपनी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यापैकी कुणीही का व्यवहार रद्द करू शकत नाही. कायद्याने हा व्यवहार रद्द करता येणार नाही, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

