पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांची बहीण आणि अन्य तीन जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संतापल्या होत्या आणि याच गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी त्या पोलिस ठाण्यात गेल्या होत्या.पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, तसेच उपस्थित पोलिसांवरही त्या संतापल्या असा त्यांच्यावर आरोप आहे . या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने रुपाली पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. याचा राग मनात धरून रुपाली पाटील यांच्या बहिणीने आपल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ माधवी खंडाळकर हिने व्हायरल केला होता. जरी नंतर गैरसमजातून हे घडल्याचे तिने सांगितले असले, तरी माधवी खंडाळकर हिने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीसह अन्य तीन जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
या घटनेनंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीनेही माधवी खंडाळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रुपाली पाटील ठोंबरे यांनी या संपूर्ण वादामागे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.माधवी खंडाळकरने रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र, त्या बदल्यात रुपाली पाटलांच्या बहिणीने हल्ला केल्याचा आरोप खंडाळकरने केला होता. त्यावरून हे संपूर्ण प्रकरण घडले आहे.

