अतिक्रमणांनी केलेली वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रयत्न
पुणे- कोंढव्यात होणारी अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम आता हळू हळू बिबवेवाडीत हि सुरु होते आहे आज मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकातून आई माता मंदीर मार्गे कात्रज कोंढवा रस्त्याकडे जाणार्या बिबवेवाडीच्या हिलटॉप हिलस्लोपवरील बेकायदा गोदामांवर आज अखेर महापालिकेने जोरदार कारवाई केली. तब्बल २७ गोदामांचे ६४ हजार २५० चौ. फुटांचे शेडस् व बांधकामे पाडून टाकण्यात आली. यामुळे येथील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष असे की, दोन वर्षांपुर्वी याठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने नोटीस देउनही व्यावसायीकांनी अतिक्रमण काढले नव्हते. राजकिय हस्तक्षेपांमुळे आतापर्यंत येथील व्यावसायीकांवर आकारलेली तीनपट कर आकारणी असो अथवा अतिक्रमण कारवाईला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुहुर्त लागल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोपवर मोठ्याप्रमाणावर गोदामे उभारण्यात आली आहेत. बहुतांश गोदामे ही बेकायदा असून सुरक्षिततेसाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्याला कान्हा हॉटेल येथे मिळणार्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिका मागील काही वर्षांपासून झटत आहे. भूसंपादनाअभावी अनेक वर्षे काम रेंगाळले आहे. याठिकाणी मोठ्या जागांवर असलेली मंगल कार्यालये आणि गोदामांमध्ये ये जाा करणारी वाहने अशातच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे या ठिकाणी सदासर्वकाळ वाहतूक कोंडी असते. येथील तीव्र उताराच्या रस्त्यावर प्राणांतिक अपघात होत असल्याने प्रशासनाने बॅरीअर्स उभारून जड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. परंतू यानंतरही अंतर्गत रस्त्याने मोठी मालवाहू वाहने येत असल्याने कोंडीचा प्रश्न तसाच आहे. दरम्यान, महापालिकेने येथील बेकायदा बांधकामांसाठी तीनपट कर आकारणी केली आहे. कराची रक्कम मोठी असल्याने काहींनी गोदामे बंद केली तर काहींनी कर भरणाच केलेला नाही.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच याठिकाणी व्हिजीट केली होती. यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्त आणि अत्यावश्यक यंत्रणा घेउन आज सकाळीच नोटीसेस दिलेल्या २७ गोदामांची शेडस् पांडून टाकण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली.

