मुंबई-शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हा वरून सुरू असलेला राजकीय आणि कायदेशीर वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ऐतिहासिक खटल्याकडे लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर अंतिम निर्णय देणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायालयात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली मूळ याचिका आणि त्यासोबत सादर केलेले अंतरिम अर्ज यावर सुनावणी होईल. 12 नोव्हेंबरच्या कामकाज यादीप्रमाणे, या खटल्याला आयटम नंबर 19 वर स्थान देण्यात आले आहे. पक्षचिन्ह आणि अपात्रता या दोन्ही मुद्द्यांवरील याचिका एकत्र ऐकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीदरम्यान अनेक संवैधानिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शिवसेनेच्या नावाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला होता. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप निर्माण केला. उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. याचिकेत म्हटले आहे की, मूळ शिवसेना पक्षाची स्थापना आणि कार्यसंघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालू होती. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर हक्क हा त्यांच्या गटाचा आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, शिंदे गटाने आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे यांच्या बाजूने असल्याने, मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व त्यांचा गटच करतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय संवैधानिक तरतुदींनुसारच असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या वादामुळे दोन्ही गटांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो.

