अभिनेते धर्मेंद्र (८९) यांच्या मृत्यूचे वृत्त हेमामालिनी आणि ईशा देओल यांनी फेटाळून लावले आहे.हे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हेमा मालिनी यांनीही नाराजी व्यक्त केली आणि लिहिले-
जे घडत आहे ते अक्षम्य आहे. जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ईशा म्हणाली:
“मीडिया पूर्णपणे खोट्या बातम्या पसरवत आहे. पप्पांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. पप्पांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.”
सोमवारी (१० नोव्हेंबर) धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती स्थिर न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुढील ७२ तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.देओल कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मुलींना परदेशातून मुंबईत बोलावण्यात आले आहे. काल रात्री सनी देओल रुग्णालयाबाहेर खूप भावनिक झाल्याचे दिसून आले, तर बॉबी देओल देखील ‘अल्फा’ चित्रपटाचे शूटिंग आटोपून मुंबईत परतले आणि ते आपल्या वडिलांना भेटले. सोमवारी रात्री उशिरा शाहरुख खान आणि सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले.

