पुणे -शहरपोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेऊन ३ दिवसात अडीचशे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांन पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली .
पुणे शहर वाहतूक विभागामार्फत दिनांक ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहिम राबविण्यात आली.या कालावधीत वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, मार्ग व गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. या विशेष मोहिमेत २५० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले.संबंधित सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यावरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि,’मद्यपान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये.स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहतूक संस्कृती जोपासावी.पुणे शहर वाहतूक विभागाकडून अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत, जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सर्वांसाठी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण व्हावे.

