पुणे-
ज्यावेळी नागरीक एकत्र येतात आणि लढा देतात, त्यावेळी यश कसे मिळते याचा प्रत्यय पर्वतीमधील शाहू वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाला थेट उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने आला आहे. आता ‘शाहू वसाहती’ची एसआरए रद्द आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया अखिल शाहू वसाहती मार्फत देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना अखिल शाहू वसाहत बचाव कृती समितीचे कार्तिक ढमढेरे म्हणाले की, पर्वती येथील स. नं. ९२ पैकी फायनल प्लॉट नं. पै. व स. नं. ९३ पैकी फायनल प्लॉट न. ५११ पैकी ५११ अ . पै. ५११ ब पै.येथे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून येथील घरे ही पक्की स्वरूपाची असून दुमजली आहेत. मात्र एका बिल्डर्ससाठी एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घातला. त्यासाठी बिल्डर्सचे लोक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने आम्हा रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार वारंवार झाले. आमचा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध आहे,आणि आम्ही तसे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असताना अधिकारीवर्ग संबंधित बिल्डर्सचा स्वार्थ आणि टीडीआरमधील भ्रष्टाचारासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करून आम्हाला येथील एसआरए योजनेत सामील होण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान करीत होते. इतकेच नाहीतर संबंधित बिल्डर्स / विकसक आणि अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविल्या. त्यामुळे अखिल शाहू वसाहतीचे सर्व नागरिकांनी एसआरएला तीव्र विरोध दर्शवत लढा उभारला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांनी पाठिंबा देत शासनदरबारी दाद मागण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांच्या व्यथा मांडताना दाद मागितली.त्यावर तत्परने सर्व बाबी तपासून शाहू वसाहतीमधील नागरिकांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ एसआरए’ला स्थगिती दिल्याचे आदेश काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता आम्हीच ‘शाहू वसाहती’चा स्वयंपुनर्विकास करणार असल्याचे अखिल शाहू वसाहत बचाव समितीने स्पष्ट केले.


