मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असे आव्हान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचे काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी करायचे असेल तर तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा, असे आव्हान केले आहे.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचे आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचे धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचे मार्केट यार्ड होते, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आली. असे सगळे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे.महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरच स्पष्ट होते. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात, अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे.

