उद्योजकता विकासावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
पिंपरी, पुणे (दि.१९ जानेवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व एमसीईडीच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचे ‘उद्योजकता विकास’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एमबीएच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
एमसीईडीच्या विविध अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. योगीराज देवकर यांनी बिझनेस माईंड सेट अँड मोटिवेशन या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात जिल्हा उद्योग निरीक्षक शैला वानखेडे यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. एमसीईडीचे माजी अधिकारी सुनंदन नलावडे यांनी विविध योजना व त्यांचे लाभार्थी यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित केले. ललित बडगुजर यांनी प्रकल्प विकास आणि राजेश कवाडे यांनी उद्योजकता काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी शेती उत्तम व्यवसाय कसा होऊ शकतो या बाबत सांगितले. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
डॉ. योगेंद्र कुमार देवकर, प्रा. ऋषी कुमार यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.